Ad will apear here
Next
दाते आणि गरजूंना जोडणारा ई-सेतू


आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांना एकमेकांबद्दल नेमकी माहिती नसते. दात्यांना गरजूंपर्यंत आणि गरजूंना दात्यांपर्यंत नेमकेपणाने पोहोचवणारा ई-सेतू ‘डोनेट एड सोसायटी’ या संस्थेच्या वेबसाइटच्या माध्यमातून नितीन घोडके या तरुणाने बांधला. त्यामुळे वापरलेल्या, पण सुस्थितीतील वस्तू गरजूंपर्यंत पोहोचू लागल्या. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज या संस्थेबद्दल...
.................
कोणतीही गाठ सोडवण्यासाठी ती उकलावी लागते. एखादी अडचण, प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे उत्तर शोधावे लागते. निग्रही, चिकाटी असलेल्या व्यक्ती प्रश्नाचा पिच्छा पुरवून त्याचे उत्तर शोधून काढतातच. रोजच्या वापरातील एखाद्या वस्तूचा वेगळ्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो, असा विचार मांडण्याचा आणि प्रयोग करून ते सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्नही अनेक जण करतात. तसंच तंत्रज्ञानाचा उपयोग काही जण हॅकिंगसाठी करतात, तर काही जण विधायक उपक्रमांसाठी करतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अमॅझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या उभ्या राहिल्या. त्यांची उलाढाल आता अब्जावधीच्या घरात आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग नितीन घोडके या तरुणाने समाजसेवेसाठी केलाय. 

आपल्या समाजात वस्तू दान करू इच्छिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध वस्तूंची गरज असलेल्यांचीही संख्या लक्षणीय आहे; पण या दोन्ही घटकांमध्ये संवादाची दरी आहे. या दरीवर मात करण्यासाठी नितीनने ‘डोनेट एड सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वेबसाइटरूपी ई-सेतू बांधला.



जगातील सर्व बाजार ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वावर चालतात. या दोन्हींमध्ये तफावत आली, की उत्पादक उत्पादनाचे प्रमाण वाढवून दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. असेच काम एका समाजसेवक तरुणाने करून दाखवले आहे. देशातल्या सामाजिक क्षेत्रात गरज आणि पुरवठा यामध्ये न सांधता येणारी मोठी दरी आहे. नितीन घोडके या तरुणाने वस्तू देऊ इच्छिणारे दाते आणि वस्तूंची गरज असलेल्या व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्यातील दरी सांधणारा ई-सेतू उभारला आहे. त्यासाठी त्याने ‘डोनेट एड सोसायटी’ ही वेबसाइट सुरू केली आहे. आपल्या घरात असलेल्या सुस्थितीतील, पण वापरात नसलेल्या वस्तूंचे फोटो आपण या वेबसाइटवर अपलोड करू शकतो. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या वेबसाइटवर त्यांना गरजेच्या असलेल्या वस्तू मिळतात का, याचा शोध घेत असतात. आपल्या संस्थेला हवी असलेली वस्तू तिथे सापडली, की ती संस्था वेबसाइटशी संपर्क करते आणि वेबसाइट दाता-गरजू यांची गाठ घालून देते. गरजू व्यक्ती किंवा संस्था दात्याच्या घरून ती वस्तू घेऊन जाते. या सेवेमध्ये अट एकच, की ती वस्तू वापरण्याजोग्या स्थितीत असायला हवी. 

घरातील जुन्या वस्तू, गाड्यांचे फोटो वेबसाइटवर अपलोड करून त्या विकणाऱ्या ओएलएक्स, क्विकर, सेकंड हँड बाजार, सेकंड हँड मॉल यांसारख्या अनेक वेबसाइट सध्या उत्तम व्यवसाय करत आहेत. ही कल्पना त्याच धर्तीवरची आहे; पण कोणताही नफा कमवण्याचा ‘डोनेट एड सोसायटी’चा उद्देश नाही.



नितीन हे रेलफोर फाउंडेशनमध्ये सीनिअर सीएसआर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. या कल्पनेबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘मी चार वर्षांपूर्वी मुळशी तालुक्यातील कातकरी पाड्यांवर सामाजिक काम करायचो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवाकार्य प्रमुख प्रा. अनिल व्यास यांच्या राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या वतीने तिथे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये मी काम करत असताना पुण्यासारख्या शहरापासून जवळच असणाऱ्या मुळशीतील भीषण सामाजिक वास्तव पाहायला, अनुभवायला मिळाले. तिथे १५० कातकरी पाडे आहेत. शिक्षणाचा अभाव, बालविवाह या सगळ्यामुळे आधुनिक विकासाच्या खुणाच तिथे पाहायला मिळत नाहीत. या पाड्यांतील तरुण कामाच्या शोधात मुंबई, कोकण, कर्नाटकापर्यंत जातात. गावांमध्ये म्हातारे आणि लहान मुले-महिलाच असतात. विकास नसल्यामुळे कुपोषणाची समस्याही तिथे मोठ्या प्रमाणावर आहे. यावर उपाय म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने तिथे धान्यवाटप, वस्तूवाटप सुरू केले. यातून खूप मोठा अनुभव मिळाला. कालांतराने मी स्वतंत्रपणे अशा वस्तू देण्याचे काम सुरू केले. पौड, आंदेशे, दिसली येथील वस्त्या मी दत्तक घेतल्या. तेथील गरजा पाहता मोठी आर्थिक मदत गरजेची होती, म्हणून मी ‘क्विक हील फाउंडेशन’चे अधिकारी अजय शिर्के यांची भेट घेतली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. फाउंडेशनने दोन समाजमंदिरे, पाण्याची टाकी बांधून दिली. त्याचबरोबर स्थानिक मुलांच्या शिक्षणासाठीही आर्थिक मदत केली. नंतर असे लक्षात आले, की आता तिथे वस्तू देण्याची गरज नाही; पण पुण्यातून येणाऱ्या वस्तूंचा ओघ कायम वाढतच होता. लोकांचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे वस्तू घेऊन जाण्यासाठी अनेक फोन यायचे. या वस्तू आणायच्या कशा, ठेवायच्या कुठे हे प्रश्न होतेच. ते सोडवतानाच ही कल्पना सुचली,’ असे त्यांनी सांगितले.



पुणेकरांच्या दानतीचा वाटा 
देशभरातील सामाजिक, राजकीय चळवळींची जननी असलेली पुण्यनगरी नेहमीच पाठीशी राहिल्याचे नितीन यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘पुणेकरांनी सढळ हाताने धान्य आणि वस्तू दिल्या, हेदेखील ही कल्पना सुचण्यामागचे एक कारण ठरले. पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावरील मॅग्नोलिया या सोसायटीत राहणाऱ्या हिमानी नारखेडे यांनी तर त्यांच्या सोसायटीत या वस्तू मिळवण्यासाठी अनेकदा आवाहन केले. त्यासाठी अनेकांच्या गाठी-भेटी घेतल्या. हिमानी यांनी ३०० सदनिका असलेल्या या सोसायटीत केलेल्या प्रयत्नांमुळे अनेकांनी ‘डोनेट एड सोसायटी’च्या कार्याला हातभार लावला. पुणेकर प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेतात, हे मी पुन्हा एकदा अनुभवले. आता आमचे काम मुंबई, नगर, नागपूर, गोवा आणि औरंगाबादमध्ये विस्तारले आहे; पण पुण्यासारखे पुढाकार घेऊन सामाजिक काम करणारे कोणीच अगदी मुंबईतही भेटले नाही.’ 

या संस्थेला मिळालेल्या वस्तूंमध्ये पेन्सिलपासून टेबल, खुर्च्या, फ्रीज, एअर कंडिशनर यांचाही समावेश होता; पण मिळालेल्या वस्तू आणि संस्थांना हव्या असलेल्या वस्तू यातही तफावत होती. फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटणाऱ्या, ओळखीच्या व्यक्तींना, संस्थांना कोणत्या वस्तू आहेत याची माहिती नितीन देत होते; पण नको असलेल्या वस्तू पडून राहत होत्या. या वस्तूंची नीट व्यवस्था लावण्यासाठी एक व्यासपीठ उभे करण्याचा विचार नितीन करू लागले.
एखादी वेबसाइट दाता व गरजू संस्था यांच्यातील दुवा ठरू शकते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने कल्पना अंमलात आणली आणि २३ जून २०१६ रोजी ‘डोनेट एड सोसायटी’ची सरकारदरबारी स्वयंसेवी संस्था व ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली. 



कल्पना झाली ‘क्लिक’
ई-कॉमर्स वेबसाइटची जाहिरात होते. त्या वेबसाइटमागे बलाढ्य कंपन्या असतात. त्यामुळे त्यांना यश मिळणे स्वाभाविक असते; पण या कोणत्याही जमेच्या बाजू नसताना सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली वेबसाइट कितपत चालेल, याबाबत नितीन यांना जरा शंका होती; पण ती कल्पना ‘क्लिक’ झाली आणि वेबसाइटवर वेगवेगळ्या वस्तूंचे फोटो अपलोड होऊ लागले. २०१६-१७ या एका वर्षात ३४८ वस्तू संबंधित गरजूंना देण्याचे काम या वेबसाइटने केले. स्वयंसेवी संस्था त्या वस्तूंच्या मालकांच्या घरी जाऊन वस्तू घेऊन जाऊ लागल्या. परस्पर विश्वासावर चालणाऱ्या देवाण-घेवाणीत व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘डोनेट एड सोसायटी’ने एकही पैसा मागितला नाही. आता या कामाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पेन्सिल, वह्या-पुस्तके, कपडे यांपासून टेबल, खुर्च्या, सोफा सेट, कूलर, एसी आणि लॅपटॉप अशा एकूण ६२५ वस्तू या माध्यमातून आतापर्यंत गरजूंना देण्यात आल्या आहेत. दाता व याचक यांच्यातील हा सेतू उभारण्याचे मोलाचे काम नितीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. 

या कामामध्ये प्रशांत महामुनी, स्वप्नील डफळ, अभिषेक गानू, किशोरी अग्निहोत्री आणि हिमानी नारखेडे यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे नितीन यांनी सांगितले.

लॅपटॉपचा फायदा
बार्शीमध्ये महेश निंबाळकर पारधी समाजातील मुलांसाठी एक प्रकल्प चालवतात. त्यांनी आपल्याला लॅपटॉप हवा असल्याचे कळवले होते. नितीन यांनी संस्थेची वेबसाइट, फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप यांमध्ये ही मागणी पोहोचवली आणि निंबाळकर यांना लॅपटॉप मिळाला. आता आपल्या संस्थेचे प्रेझेंटेशन ती मुले लॅपटॉपवर करतात. त्यामुळे संस्थेला मदत मिळण्यास उपयोग होतो. 



योग्य संधी किंवा व्यासपीठ मिळणे हे व्यक्ती किंवा संस्थेच्या जीवनात गरजेचे असते. तसेच एक व्यासपीठ ‘डोनेट एड सोसायटी’ने उपलब्ध करून दिले आहे आणि त्याचा व्याप वाढतो आहे. समाजासमोर असलेल्या एका प्रश्नाची उकल नितीन घोडके यांनी केली आहे. वेबसाइट, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या तीन माध्यमांतून चालणाऱ्या या कामाला आणखी गती मिळण्यासाठी आपणही सर्वांना हे सांगणे गरजेचे आहे. 

संपर्क : नितीन घोडके, संस्थापक अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी
मोबाइल  : ९११२१ २७७०५ 
पत्ता : तिसरा मजला, फ्लॅट क्रमांक ४/५, सिंचननगर, रेंजहिल्स रोड, पुणे. 
वेबसाइट : https://idonateaid.org/ 

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(डोनेट एड सोसायटीचे अध्यक्ष नितीन घोडके यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZOPBT
 Very gud activity.... GOD BLESS YOU All... For your hard work. We always have cloths but your address is very far... Even sum other stuff... How to deliver...1
 Nice
 Grate activity
 Hope , it gets large response .
Similar Posts
भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’ भारतातल्या अनेक समाजसुधारणांचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या तरुणाईनं नवं अभियान सुरू केलं आहे. कोंढव्यातल्या लुल्लानगरमध्ये राहणाऱ्या विशाल ओव्हाळ, संदीप बधे आणि अमोल वाघमारे या तरुणांनी रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘भिक्षेकऱ्यांना भीक
आरोग्य आणि संस्कारांचा वसा घेतलेले सेवा आरोग्य फाउंडेशन समाजातील दुर्लक्षित, आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना, शहरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या पुणेकरांना अल्प मूल्यात आरोग्य सुविधा देण्याचे काम सेवा आरोग्य फाउंडेशन ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून अविरतपणे करत आहे. आरोग्यवर्धन, किशोर विकास आणि समृद्धी वर्ग असे तीन उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. जनजागृतीपर
वस्तुवापराचं वर्तुळ ‘पूर्ण’ करणारी संस्था ‘टाकाऊतून टिकाऊ’ हा विचार केवळ लिहिण्यापुरता मर्यादित न ठेवता तो तंतोतंत अंमलात आणण्यासाठी धडपडणारी पुण्यातली संस्था म्हणजे पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन. प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आदींचा योग्य आणि अभ्यासपूर्ण पुनर्वापर, जनसामान्यांमध्ये जागृती, सॅनिटरी नॅपकिन्सची शास्त्रीय विल्हेवाट असे पर्यावरणविषयक अनेकविध उपक्रम ही संस्था राबवते आहे
‘मधुर भावा’ने सेवा करणारा वृद्धाश्रम ज्येष्ठांची अत्यंत आपुलकीने काळजी घेणारा ‘मधुरभाव’ हा वृद्धाश्रम पुण्यामध्ये पिंपळे-निलख परिसरात आहे. ‘डिमेन्शिया’ग्रस्त ज्येष्ठांसाठी विशेष सोयीही इथं आहेत. फार्मसी उद्योगात मोठ्या पदावर काम केलेल्या अंजली देशपांडे मधुरभाव वृद्धाश्रमाच्या संस्थापक-संचालिका आहेत. जगण्याचं स्वातंत्र्य, पॅलिएटिव्ह केअर,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language